आयुष्य हा एक प्रवास आहे. आपण प्रवासी. ह्या प्रवासात आयुष्य हीच आपली गुरूमाऊली. तीने दिलेली प्रत्येक आठवण, प्रत्येक क्षण, प्रत्येक अडचण, प्रत्येक शिकवण, व संपूर्ण जीवनच, कणाकणाने आपले व्यक्तीमत्व घडवत असते.
ह्याची प्रचीती आपल्याला होते व्यंकटेशा कॉम्प्युटेकचे संचालक, संगणक प्रशिक्षक, कवी आणि लेखक, सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनर, व गायक, अशा विविधअंगी भूमिका बजावणारे एक यशस्वी ऊदयोजक, श्री. महेश भालचंद्रराव रायखेलकर, ह्यांच्या जीवनप्रवासातून आणी त्यांच्या लेखनीतून प्रसीद्ध झालेल्या कविता व लिखाणातून.
जशी त्यांची सोशल मिडीयावर लोकप्रिय झालेली, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली कविता, ‘तो भारत माझा’ ती आपण त्यांच्याचकडून ऐकूया.
मी: “नमस्कार सर.’’
महेश जी: “नमस्कार. तर अशी आहे ही कविता…”
“क्रांतीवीर जीथे गेले फासावरती। पवित्र आहे जिथली माती। तो भारत माझा॥
तिरंगा फडके जीथे डौलात। संत जन्मले ज्या भूमीत। तो भारत माझा॥
पृथ्वीला जो कुटुंब मानतो। जगाला मानवतेचा संदेश जो देतो। तो भारत माझा॥
सर्व धर्माचा जीथे आदर। ज्ञानाचे जीथे समृद्ध भांडार। तो भारत माझा॥
जन–गण–मन जीथे प्रत्येक मनात। संस्कृती जीथे पूजतात। तो भारत माझा॥
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा जीथे। हसत हसत प्राण दयावा तीथे। तो भारत माझा। तो भारत माझा। तो भारत माझा॥“
तर आता ऐकुया महेशजींकडून त्यांच्या ‘एका नोकरदारापासून ते व्यंकटेशा कॉंम्प्युटेक च्या यशाच्या उत्तुंग शिखरावर भरारी घेतलेल्या अश्या प्रेरणादायी ऊदयोन्मुख जीवनप्रवासाची कहाणी ‘महाराष्ट्र रिव्हयू’च्या हया विशेष भागात…
सर!, माझा पहिला प्रश्न: आपली सुरूवात कशी व कुठून झाली? कोणकोणत्या अडचंणीवर मात करून तुम्ही तुमचे ईस्टीटयुट उभारले व आज त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर प्रस्थपित केले?
नमस्कार मी महेश भालचंद्रराव रायखेलकर. माझा जन्म तेव्हाचे उस्मानाबाद व सध्याचे धाराशिव, येथे एका मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटूंबात झाला. आम्हा दोन भावंडात मी सर्वात लहान. माझे वडील तेव्हा पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते तर आई गृहिणी. माझ्या जन्माच्या वेळेसच वडिलांना पी.एस.आय. चे प्रमोशन मिळाल्याने आणि मी सर्वात लहान शेंडीफळ असल्याने तिन्ही भावंडात मी आई वडिलांचा ज्यांना आम्ही पप्पा म्हणायचो लाडका होतो. सध्या मोठा भाऊ पुणे येथे इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहे तर मोठी बहीण धाराशिव येथे आकाशवाणी निवेदिका, महिला उद्योजिका म्हणून कार्यरत आहे. वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे माझी बालवाडी बीड येथे तर १ली ते ५वी होलिक्रॉस प्रशाला तेव्हाचे औरंगाबाद तर सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे झाले. माझे आजोळ धाराशिव. माझ्या आजीला म्हणजे आईच्या आईला घश्याचा कॅन्सर झाल्याने व माझी आई तीची मोठी मुलगी असल्याने तिच्याजवळ तिची देखभाल करण्यासाठी कोणीतरी हवे म्ह्णून माझ्या वडिलांनी धाराशिव येथे बदली करून घेतली. तेव्हा पुढील शिक्षण म्हणजे ५ वी ते १०वी धाराशिव येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. शालेय जीवनात मी अभ्यासात जेमतेंम होतो म्हणजे फार ढ नाही व फार हुशारही नाही. शाळेत असतांना एन.सी.सी. मध्ये होतो त्यामुळे माझ्यावर एन.सी.सी. मधील शिस्तीचा प्रभाव पडला. एन.सी.सी. चे व आम्हाला सायन्स शिकविणारे श्री. एस. आर. पाटील सर यांचा कडक शिस्तीचा परिणाम माझ्यावर खूप झाला. आताही बोटाची नखे वाढली, डोक्यावरील केसे वाढली की सरांची आठवण येथे व लगीच ती काढली जातात. तसा माझा मूळ स्वभाव शांत. ठराविक लोकांचीच माझी मैत्री, पण मैत्री केली की ती पक्की. आजही सोशल मीडियामुळे शालेय मित्राची नाळ जुळून आहे. शालेय जीवनातच वाचनाची आवड लागली. मला आठवतंय शिवाजी सावंत यांची ‘मृत्युन्जय’ हि कादंबरी मी दहावीत असतांनाच वाचली. दहावीनंतर मी वाणिज्य शाखा निवडली व ११वी आणि १२वी त्याच शाळेच्या जुनियर कॉलेज मध्ये पूर्ण केली. पुढे धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मी बी.कॉम. पहिले वर्ष पूर्ण केले. त्याच वेळी माझ्या वडिलांची बदली लातूर येथे झाली आणि बी.कॉम. पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष मी लातूर येथे दयानंद महाविद्यालयात पूर्ण केले.
मला खरं तर पुढे एम.बी.ए. करायचे होते पण नंबर न लागल्याने मी पुढे नांदेड येथे माझ्या मोठ्या भावाकडे राहून डी.बी.एम. केले. पुढे माझ्या वडिलांची बदली सोलापूर येथे झाली. त्याच वेळेस संगणक शिक्षणाचे वारे चहूकडे वाहत होते. तेव्हा मी सोलापूर येथील न्यू -एज कॉम्प्युटर मधे कॉम्प्युटर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथेच मी काही शासकीय संगणक अभ्यासक्रम पूर्ण करत एम.सी.एस. पूर्ण केले. त्यानंतर मी सोलापूर येथील सुजय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये कॉम्प्युटर टीचर म्हणून कामास लागलो. ही माझी पहिली नोकरी. याच दरम्यान मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोडला गेलो. राष्ट्रीयत्व भावना, देशप्रेम यातून वाढीस लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनेक शिबीरे, विविध उपक्रम यात माझा सहभाग त्यावेळी होता व आजही आहे. याच दरम्यान मी सोलापूर येथील नुकत्याच चालू झालेल्या पण शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या एका संस्थेत कॉम्प्युटर विभाग कोऑर्डिनेटर म्हणून जॉईन झालो. संस्था व तिची मातृसंस्था मोठी असल्याने येथेच आपण चांगले काम करून स्थीर होणार अशी भावना त्यावेळीस होती. पण माझ्या नशिबात काही वेगळेच होते. पुढे याच संस्थेच्या मॅनेजमेंटच्या निवडणुकीत सध्याच्या मॅनेजमेंटचा पराभव झाला. तेव्हा नवीन मॅनेजमेंटने सूडभावनेने आधीच्या कर्मचारी मी आणि अजून एक यांचा काहीही दोष नसतांना आम्हाला काढून टाकले. माझी ४ वर्षाची मेहनत वाया गेली. जेथे मी स्थिर होण्याचे स्वप्न बघत होतो. संस्था नवीन असतांना जेथे ती वाढवण्यासाठी मी अपार कष्ट घेतले तेथून मला काढले गेले. नोकरी जाण्याचे दुःख नव्हते पण ज्या प्रकारे काहीही दोष नसतांना फक्त मॅनेजमेंट बदल्याने, अंतर्गत राजकारणामुळे माझा बळी गेला याची बोच राहिली. संस्थेचे नाव येथे नमूद केले नाही कारण आता मला कोणताही नवीन वाद करण्यात काडीचाही रस नाही. पण जे होते ते चांगल्यासाठी होते असे आता मला वाटते. मला जर तेथून नोकरी मधून काढले नसते तर मी स्वतःचा स्टार्टअप कधी चालू केलाच नसता. कायम आयुष्यभर नोकरीच केली असती.
हि नोकरी गेल्यानंतर आपण आयुष्यभर नोकरी कधीच करायची नाही असे मी मनोमन ठरवले. पण स्वतःचे इन्स्टिटयूट काढण्यासाठी भांडवल लागते ते माझ्याजवळ नव्हते. वडील नुकतेच रिटायर्ड झाले होते म्हणून त्यांच्याकडूनही काही भांडवल मिळणे शक्य नव्हते. तेव्हा मी काही कॉम्प्युटर इन्स्टिटयूट मध्ये अर्धवेळ काम करत ‘व्यंकटेशा कॉम्प्युटेक’ या नावाने ‘आपला संगणक = आमचे प्रशिक्षण’ अंतर्गत घरी किंवा ऑफिस मध्ये संगणक प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. सोलापुरातील डॉक्टर, वकील, उद्योजक, इंजिनियर, विद्यार्थी यांना घरी किंवा ऑफिस मध्ये जाऊन मी संगणकाचे प्रशिक्षण दिले. सोलापुरातील वेगवेगळ्या भागात अगदी पहाटे सहा ते रात्री आठ नऊ पर्यंत मी घरी किंवा ऑफिस मध्ये संगणकाचे प्रशिक्षण मी दिले आहे. पैसा बऱ्यापैकी मिळायचा पण धावपळ फार व्हायची. सोलापूरच्या एका टोकाला एक विद्यार्थी तर दुसरा विद्यार्थी दुसऱ्या टोकाला अशी अवस्था होती.
याच दरम्यान माझे लग्न पेशाने शिक्षिका असलेली पूर्वाश्रमीची प्रणोती वागदरीकर हिच्याशी झाले. त्या दरम्यानही काही कॉम्प्युटर इन्स्टिटयूट मध्ये अर्धवेळ काम करत व्यंकटेशा कॉम्प्युटेक या नावाने “आपला संगणक = आमचे प्रशिक्षण” अंतर्गत घरी किंवा ऑफिस मध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचे काम माझे चालूच होते. आपण असे किती दिवस घरी किंवा ऑफिस मध्ये जाऊन प्रशिक्षण देणार हे लक्षात घेऊन काही पत्नीच्या नोकरीवर कर्ज काढून व काही स्वतःची जमवलेली पुंजी खर्च करत सोलापूर येथे विजापूर रोडवर भाड्याच्या जागेत व्यंकटेशा कॉम्प्युटेक या संस्थेची सन २००९ मध्ये सुरवात केली. याचे उदघाटन वडिलांच्या हस्ते केले. मी माझ्या घरातील पहिला व्यावसायिक. माझी स्वतःची इन्स्टिटयूट सुरू झाली हे पाहून मी खुश होतो. याच दरम्यान मला मुलगा झाला. आम्ही त्याचे नाव पार्थ असे ठेवले. तो सध्या ११ वी सायन्स करीत आहे. संस्था दोन वर्ष सुरु झाल्यानंतर जागा मालकाने जागा विकण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. मी तयार झालो कारण जागा मालकीची होणार होती. खरं तर पैशाची तजवीज करणे अवघड होते पण काहीतरी करून हि जागा घेऊ म्हणजे परत आपल्याला जागा बदलावी लागणार नाही हे लक्षात घेऊन मी तयार झालो. पण जागा मालकाच्या मनात काही तरी वेगळेच होते. एकेदिवशी माझा कॉम्प्युटर क्लास चालू असतांना जागा मालक आला व ‘मला जागा विकायची नाही ‘असे म्हणू लागला. मी त्याला १ लाख जागेपोटी ऍडव्हान्स दिले होते. त्याने माझ्या विद्यार्थ्यांसमोर मला शिवीगाळ केली. मी त्याच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. जागा मालकाने व त्याच्या एका पुढारी मित्राने पोलिसांना मॅनेज करत माझ्यावर जागा खाली करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली. मी पोलिसांना सांगितले कि ‘जो पर्यंत मला नवीन जागा मिळत नाही तो पर्यंत मी जागा खाली करणार नाही‘. घरात फार टेन्शनचे वातावरण होते. जागा मालकाने माझ्याविरुद्ध खोटीच पोलीस कंप्लेंट केली. मी फारच निराश झालो. दोनच वर्षापूर्वी अगदी थाटामाटात चालू केलेले इन्स्टिटयूट बंद पडते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
पण मी धीर सोडला नाही. जागा मालकाकडून ऍडव्हान्स दिलेले १ लाख वसुल केले. त्याला किंवा त्याच्या मित्राला १ लाख काही दिवस वापरयाचे होते म्हणून त्याने जागा विकण्याचे नाटक माझ्या सोबत केले हे नंतर मला कळाले. मला या प्रकरणाचा खूप मानसिक त्रास झाला. बीझनेस वर देखील याचा परिणाम झाला. दुसरी जागा बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता. माझा नवीन जागेचा शोध संपला. जुळे सोलापूर येथे डॉक्टर श्री. राघवेंद्र कुलकर्णी यांची जागा मला मिळाली. मी तेथे माझी संस्था शिफ्ट केली. काही वर्षानंतर डॉक्टर राघवेंद्र कुलकर्णी यांनी जागा विकण्याचा प्रस्ताव ठेवला. मी तयार झालो. आधीचा वाईट अनुभव माझ्या पाठीशी होता तेव्हा व्यवहारात सावध पवित्रा घेत मी व माझ्या पत्नीने हा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला. आधीची पोलीस केस ते स्वतःच्या मालकीची जागा हा प्रवास संघर्षमय होता. आता मागे वळून पहातांना असे वाटते कि त्या वाईट प्रसंगाने मी कणखर झालो. व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यास सक्षम झालो.
सर! पुढचा प्रश्न: व्यंकटेशा कॉंम्प्युटेक कोणकोणत्या विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण देतो?
सन 2009 साली फक्त संगणक प्रशिक्षण या विभागात काम करणारी व्यंकटेशा कॉम्प्युटेक ही संस्था सध्या एकूण पाच विभागात विविध सेवा केवळ सोलापूरकरांना नाही तर सोलापूर बाहेरील ग्राहकानांही पुरवत आहे.
आमच्या विविध विभागा अंतर्गत असलेल्या सेवा व्यंकटेशा ट्रेनिंगच्या अंतर्गत आम्ही खालील संगणक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देतो.
१. सी.सी.सी. “केंद्र व राज्य सरकारी/निमसरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेला मान्यताप्राप्त कोर्स”
२. एम.एस. ऑफीस
३. टॅली इ. रा. पी. ९
४. डी. टी. पी.
५. सी. सी विथ डेटा स्ट्रक्सर
६. व्ही. बी.
७. जावा
८. एच. टी. एम . एल .
९. पायथॉन
१० जिम्प
११. स्क्रॅच
१३. मराठी व इंग्लिश टायपिंग
१४. इंटरनेट
१५. कस्टम बिल्ट कोर्स
१६.ऑटोकॅड
व्यंकटेशा सर्व्हिसेस अंतर्गत आम्ही खालील प्रकारची सेवा ग्राहकांना देतो.
१. सर्व प्रकारचे ऑन लाईन फॉर्म भरणे
२. स्कॅनिंग
३. प्रिंटिंग
४. टायपिंग “मराठी व इंग्लिश”
५. लॅमिनेशन
६. कुरिअर
७. पॅन कार्ड
८. इ-लॉकर
९. मनी ट्रान्सफर
१०. सर्व प्रकारचे ऑनलाईन बील भरणा
११. गिफ्ट मॅनेजमेंट सर्विसेस
१२. आधार पी. व्ही . सी. कार्ड
१३. मोबाईलला लिंक असलेले आधार अपडेट
१४. श्रम कार्ड
१५. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
१६. कन्टेन्ट रायटिंग सर्व्हिसेस
१७. मतदान कार्ड
१८. प्रॉव्हिडंड फंडाची कामे
१९. ऑनलाईन डेटा प्रोसेसिंग मॅनेजमेंट सिस्टिम
२०. आधार पॅन लिंक
व्यंकटेशा सेल्फ डेव्हलपमेंट अंतर्गत आम्ही खालील सेल्फ डेव्हलपमेंट सेशन्स घेतो.
१. सेल्फ डेव्हलपमेंट सेशन सिरीज- “स्वॉट अन्यालीसीस, लॉ ऑफ अट्रॅक्शन, थॉट्स मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट इ.”
२. कवितेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास
३. फाईव्ह मंत्रा ऑफ सक्सेस
४. एन.एल.पी.
व्यंकटेशा क्रिएशन अंतर्गत आम्ही खालील कार्यक्रम सादर करतो
१. कवितेच्या गावा जावे
२. तिच्या कविता तिची गाणी
३. रंग माझ्या लेखणीचे “ब्लॉग”
४. महेश रायखेलकर/Mahesh Raikhelkar “युट्युब चॅनेल”
५. स्वरसंगम सोलापूर “मराठी/ हिंदी भक्ती, भाव, चित्रपट गीतांचे सादरीकरण”
व्यंकटेशा सेल्स अंतर्गत आम्ही खालील वस्तूंची विक्री करतो
१. सी. डी.
२. डी.व्ही. डी
३. पेन ड्राईव्ह
४. कॉम्प्युटर पेपर
५. माऊस
६. अँटीव्हायरस
अशा प्रकारे वरील पाच विभागात आम्ही कार्य करत आहोत. रेल्वे इन्स्टिटयूट सोलापूर येथे आम्ही सलग ८ वर्ष ट्रेनिंग प्रोव्हायडर म्हणून काम पाहिले. सोलापुरातील ब्लॉसम नर्सरी स्कुल आणि लोटस नर्सरी स्कुल यांना अबॅकस चे ट्रेनिंग आम्ही दिले. अनेक विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून विविध संगणक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले. रिगल हॉटेल मॅनॅजमेण्ट व टिळक नर्सिंग महाविद्यालय येथे आय.टी. विषयासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मी काम पाहिले. स्वतःच्या व्यवसायात नवीन नवीन संकल्पना राबविल्या. कंन्टेट राइटिंग सर्व्हिसेस, ऑनलाईन डेटा प्रोसेसिंग मॅनेजमेंट सिस्टिम, गिफ्ट मॅनेजमेंट सिस्टिम, कवितेच्या गावा जावे, तिच्या कविता तिची गाणी, स्वर संगम सोलापूर, हे आमच्या नावीन्यपूर्णतेचे आविष्कार आहेत. या सर्व सेवेसाठी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. नावीन्यपूर्णतामुळे तुम्ही स्पर्धेत टिकून राहता असे मी मानतो. वर्षानुवर्षे ग्राहक आमची सेवा घेतात. एकाच घरातील दोन सदस्य आमचे विद्यार्थी आहेत. ६ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या वयोगटातील आमचे विद्यार्थी आहेत.
संस्थेचा ५ वा वर्धापनदिन आणि दशकपूर्ती आम्ही मोठया थाटामाटात साजरी केली. पाचव्या वर्धापनदिनास आई वडील दोघेही उपस्थित होते. त्यावेळेसचा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही माझ्या चांगला स्मरणात आहे.
खुपच छान सऱ! तर पुढचा प्रश्नः आपल्या संस्थेच्या माथ्यमातून व्यवसायासोबत सामाजीक बांiधलकी संदभा–त आपण काय करताहात?
सन २०१४ मध्ये पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचे आयॊजन केले होते. या वर्धापनदिनापासून पुढील प्रत्येक वर्धापनदिन हा एक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आम्ही ठरवले. या अंतर्गत आत्तापर्यंत रक्तदान शिबीर, बाल सुधार गृह “रिमांड होम” मधील मुलांना खाऊ व खेळ साहित्य वाटप, ब्रिजधाम येथील वृद्धांना चादरीचे वाटप, देहदान या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन, लोकमंगल अन्नपूर्णा येथे अन्नदान, वंचित लोकांना उन्हाळ्यात चपला वाटप, कोरोना काळात मुखमंत्री निधीला सहाय्य असे उपक्रम राबविले.
सन २०१४ पासून मी लिहण्यास सुरुवात केली. त्यास कारण ही तसेच होते. याच वर्षी माझ्या आईचे झालेले निधन. तिच्या जाण्याच्या दुःखातून सावरण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली. पहिले तिच्यावर कविता लिहल्या आणि नंतर आपल्याला जमतेय असे वाटल्या नंतर लिहता झालो. कविता, हायकू कविता, लेख, कथा असे लिखाणाचे सर्व प्रकार हाताळले. पण पहिले प्रेम विचाराल तर कविताच. अनेक राज्यभरातील कवी संमेलनात कविता सादर केल्या. “कवितेच्या गावा जावे” “तिच्या कविता तिची गाणी” “कवितेच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास” या तीन कवितेच्या आधारावरील कार्यक्रमाची निर्मिती केली व त्याचे प्रयोगही केले. अनेकदा वर्तमान पत्र, दिवाळी अंक, मासिक, यातुन कविता, लेख प्रसिद्ध झाले. त्याला वाचकांची पसंदी मिळाली, प्रेम मिळाले. काहींनी आवर्जून फोन वरून लेख, कविता आवडल्याचे सांगितले. काही संस्थेकडून लेखनासाठी सन्मानित झालो. काव्यप्रेमी शिक्षक मंच ची शहर आणि नंतर जिल्हा अध्यक्ष जबाबदारी आल्यानंतर मंचाच्या वतीने कोरोना काळात “कवी कट्टा” हा उपक्रम वर्षभर राबवला ज्यात राज्यातील कवींनी सहभाग नोंदविला. सन २०२२ पासून चालू असलेल्या “अशी सुचली मला ही कविता” या उपक्रमासही राज्यातील कवींनी उत्तम प्रतिसाद दिला. “रंग माझ्या लेखणीचे” या ब्लॉग द्वारे सर्व लिखाण वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. स्वतःच्या युट्युब चॅनेल द्वारे काही कवितेचे सादरीकरण केले.
प्रेम, जीवनकौशल्य, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, राजकारण असे विविध विषय लिखाणातून हाताळले. मला माहित नाही मी जे लिहतो त्याला साहित्यिक मूल्य किती आहे, माझ्या लिखाणाचा काही परिणाम समाज मनावर होतो का नाही, prMtu लिखाणामुळे माझे जीवन मात्र समृद्ध झाले हे नक्की.
कोरोनाच्या काळात बराचसा वेळ रिकामा होता. कोरोनाच्या काही महिने आधी मी सोलापूरयेथील प्रसिद्ध गायन शिक्षक श्री किरण जोजारे सर यांच्याकडे हार्मोनियम आणि गाण्याचे प्रशिक्षण सुरु केले. कोरोनामुळे हे प्रशिक्षण बंद करावे लागले. पण या दरम्यान खूप रिकामा वेळ होता तेव्हा कराओके ट्रॅक वर खूप गाणी गायली. गाण्याचा हा छंद आजही चालू आहे. याच दरम्यान मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून एम.कॉम. पूर्ण केले. २०१९ ला माझ्या वडिलांचे निधन झाले.
“भारत विचार मंच”
लेखनाच्या माध्यमातून मी सामाजीक प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले. तसेच व्यवसाया सोबत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आमच्या संस्थेच्या वर्धापन दिन “व्यंकटेशा कॉम्पुटेक” एक सामाजिक उपक्रम राबवून आम्ही साजरा करतो. एवढ्या पुरते मर्यादित न राहता, स्वातंत्र्य दिनाच्या शुभ- मुहूर्तावर “१५:०८:२०१८” एका सामाजिक मंचाचा शुभारंभ करून सामाजिक कार्याचा परीघ वाढवला तो मंच म्हणजे भारत विचार मंच. याचे ब्रीद ठेवले ‘मी फक्त भारतीय, भारत माझा विचार’ आणि प्रतिज्ञा ठरवली जी आपण सर्व शाळेतून वर्षानुवर्षे म्हणतो ती म्हणजे ‘भारत माझा देश आहे.’ याची उद्दिष्टे खालील प्रमाणे ठरवली
१. “मी फक्त भारतीय, भारत माझा विचार” हे ब्रीद जन-मानसात रुजविणे.
२. गायन, काव्य, लेखन, नाटय इ. साठी व्यासपीठ निर्माण करणे.
३. रक्तदान, अवयवदान ‘प्रचार’ अन्नदान, वस्त्र दान इ. घडवून आणणे.
४. करीअर, उद्योग, स्पर्धा, परीक्षा,व्यक्तीमत्व विकास इ. विषयांवर मार्गदर्शन शिबीर आयोजीत करणे.
५. पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबविणे “वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी इ.
६. विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा विषयक स्पर्धा आयोजीत करणे.
७. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे.
८. समाजातील वंचीत घटकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करणे.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभ- मुहूर्तावर “१५:०८:२०१८” दशमेश हायवे सर्व्हिस सोलापूर येथे झेंडा वंदन केल्यानंतर तिरंग्याच्या साक्षीने, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत काम केलेले जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व भारतीय सेनेत कॅप्टन पदावर कर्त्तव्य बजावलेले श्रीमान कॅप्टन सोहनसिंग सराय यांच्या शुभहस्ते ‘भारत विचार मंच‘ चे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कॅप्टन सोहनसिंग सराय यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच दशमेश हायवे सर्व्हिस च्या संचालिका सराय भगिनी यांचा देखील पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. एका जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी व सैनिकाचे आशिर्वाद आम्हाला या प्रसंगी लाभले. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सत्कार करणे या अंतर्गत ३००० ब्लॉग लिहिणा-या व ज्यास गुगल ने स्वखर्चाने अमेरिकेत सत्कारासाठी निमंत्रण दिले आहे अश्या ओंकार जंजीराल याचा सत्कार भारत विचार मंच तर्फे करण्यात आला. बिकट परिस्थितीमध्ये त्याने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. दिवाळी आनंदाचा सण, प्रकाशाचा सण. परंतु आपल्याच काही बांधवांपर्यंत हा आनंद, प्रकाश जाऊं शकत नाही. आपली हि जबाबदारी आहे कि तो आनंद, प्रकाश त्यांच्यापर्यंत घेऊन जाणे. हाच विचार लक्षात घेऊन भारत विचार मंच तर्फे दि. ०५.११.२०१८ ‘सोमवार’ रोजी रेवणसिद्वेश्वर मंदिर रोड येथील मूर्तीकार बांधवांसाठी फराळ वाटप उपक्रम केला गेला. पुढे “रक्तदान-श्रेष्ठदान” हे लक्षात घेऊन १०.०३. २०१९ ‘रविवार’ रोजी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले २७ फेब्रुवारी ‘मराठी राजभाषा दिनाचे‘ औचित्य साधून ‘वाचन चळवळ‘ वृद्धिगत व्हावी या उद्देशाने दि. २७,२८,२९ फेब्रुवारी २०२० दरम्यान ‘वाचन प्रेरणा महोत्सव‘ चे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत वाचकांना उपलब्ध पुस्तकांतून एक पुस्तक घरी वाचनासाठी मोफत दिले. ते त्यांनी घेतल्या पासून एक महिन्याच्या आत वाचुन परत करणे अपेक्षित होते. या पुस्तकात विवेकानंद, रामदेव बाबा, पु. ल. देशपांडे, कवी संजीव, चंद्रशेखर गोखले, विश्वास नांगरे पाटील, वसंत बापट, अशा नामवंत लेखकांनी लिहलेली नाटक कविता संग्रह, कादंबरी, विचारधन, चारोळी संग्रह, ललित लेखन, प्रेरणादायी, आरोग्य विषयक पुस्तकांचा समावेश केला गेला. त्याच बरोबर या महोत्सवात भाग घेण्या-या प्रथम तीन वाचकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. नंतर गायक कलाकारांना एक व्यासपीठ मिळावे या हेतूने व देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी या उद्देशाने २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘भारत विचार मंच’ तर्फे ऑनलाईन गुगल मीट वर २६ गायक कलाकारांचा देशभक्तीपर गीतांचा “जरा याद करो कुर्बानी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भविष्यात देखील या मंचाद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
व्यंकटेशा कॉम्प्युटेकच्या सेल्फ डेव्हलपमेंट विभागा मार्फत सन २०२२ च्या विजयादशमीपासून सन २०२३ च्या विजयादशमीपर्यंतची सेल्फ डेव्हलपमेंट आणि लाईफ स्किल वरील मालिका संपन्न झाली. व्यंकटेशा कॉम्प्युटेकच्या सेल्फ डेव्हलपमेंट विभागा मार्फत सन २०२२ च्या विजयादशमीपासून ऑनलाईन पद्धतीने व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून मोफत मराठी भाषेत सेल्फ डेव्हलपमेंट आणि लाईफ स्किल वरील मालिका चालू करण्यात आली होती. २०२३ च्या विजयादशमीला यशस्वीपणे या मालिकेची सांगता झाली. या मालिकेमध्ये २०२२ ची विजयादशमी जी की बुधवारी आली होती म्हणून दर बुधवारी वर्षभर सेल्फ डेव्हलपमेंट वरील सेशन व्हिडिओ स्वरूपात किंवा लाईफ स्किल वरील लेख ब्लॉग स्वरूपात यापैकी एक ग्रुपमधील सदस्य यांना देण्यात आले. सेल्फ डेव्हलपमेंट वरील सेशन मध्ये स्वॉट अन्यालीसीस, लॉ ऑफ अट्रॅक्शन, थॉट्स मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, मोटिवेशन अशा एकूण २६ सेशनचा समावेश या मालिकेत केला गेला तर गुणांची उजळणी करूया, नात्याचे बॅलन्सशीट, जीवनशास्त्र कोण शिकविणार, अध्यात्म आणि आपण, मनाचा दसरा काढला का, अशा लाईफ स्किल वरील २४ लेखांचा समावेश केला गेला. राज्यातील विविध भागातील व्यक्तींनी या मालिकेत सहभाग घेत याचा लाभ घेतला ज्यात डॉक्टर, नोकरदार, शिक्षक, गृहिणी, व्यवसायिक यांचा समावेश होता. मी या मालिकेचे मार्गदर्शन व संचालन केले. व्हिडिओ व लेख या दोन्हीचा समावेश असलेली वर्षभर चाललेली हि एकमेव मालिका होती. ज्या महाविद्यालयाचा मी विद्यार्थी त्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंसच्या विध्यार्थी लोकांना कोरोना काळात सेल्फ डेव्हलपमेंटचे सेशन ऑनलाईन स्वरूपात घेतले. सेल्फ डेव्हलपमेंटचे सेशन ऑफलाईन व ऑनलाईन नेहमीच चालू असतात.
अiतशय ऊत्तम! सऱ शेवटचा प्रश्नः आजतयागत तुम्हाल बरेच पुरस्कार व सन्मान iमळाले असतील़ तर त्यांबद्दल वाचकांना काही माहीती देऊ शकाल काÆ
na@kIca. आजपर्यंत लायन्स क्लब सोलापूर, साने गुरुजी कथा माला सोलापूर, झी मराठी, स्टोरी मिरर मुंबई, स्वर्ण पुष्प साप्ताहिक औसा ‘लातूर’ यांच्या कडून सन्मानित. तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच तर्फे “काव्य काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार २०२३” राज्यस्तरीय पुरस्कार ने सन्मानित. तसेच नुकताच एस फोर पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे “साहित्यरत्न २०२४“ या पुरस्काराने सन्मानित.
आजपर्यंतची वाटचाल आई-वडिलांचे आशीर्वाद, लेखनासाठी सरस्वतीची कृपा, वाचकांचे प्रेम, यामुळे हे शक्य झाले असे नम्रपणे येथे नमूद करतो. शेवटी माझ्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे साथ विशेषतः माझी सौ. व माझा मुलगा ज्यांच्या पाठींब्याशिवाय प्रोत्साहना शिवाय मी हा टप्पा गाठू शकलो नसतो. मित्र परिवाराचे प्रोत्साहन, पाठींबा म्हणून हि वाटचाल सोपी झाली. व्यंकटेशा कॉम्प्युटेकचा संचालक, संगणक प्रशिक्षक, कवी आणि लेखक, सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनर, गायक, अशा विविधअंगी भूमिका सध्या मी बजावतोय. माझ्या परीने समाजाची काही प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवून सेवा करतोय. काव्यप्रेमी शिक्षक मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बी.बी.एन. याच्याशी मी सध्या संलग्न आहे. आजपर्यंतची वाटचाल संघर्षमय, अनेक अडचणीची, धडपडीची होती. सकारात्मकता, उत्साही स्वभाव, पडेल ते काम करण्याची तयारी, प्रामाणिक पणे केलेले कष्ट, याच्या जोरावर जीवनाचा आजपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. अजूनही अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत. आपल्या सदिच्छाच्या बळावर ती पूर्ण होतीलच.
नक्कीच सर आमच्या, आमच्या संस्थेच्या व सव– वाचकांतफे– मी आपणास सiदच्छा देतो़ आपला पुढचा प्रवास आपल्याला पुन्हा किर्तिच्या नवनविन कळसांवर नेवो हीच शुभेच्छा. तर सर, शेवट करण्याआधी आमच्या वाचकांसाठी एखादी कiवता म्हणाल काÆ
व्वा का नाही. कiवतेचं शिर्षक आहे ‘महाराष्ट्र माझा’
“भवानीमाता जेथे वसती तो महाराष्ट्र माझा। विठ्ठल उभा विटेवरती तो महाराष्ट्र माझा।
शिवाजीची जन्मभूमी तो महाराष्ट्र माझा। संतांची जी कम-भूमी तो महाराष्ट्र माझा।
फुले–आंबेडकरांना जेथे पुजती तो महाराष्ट्र माझा। गौरी–गणपतीची जेथे भक्ती तो महाराष्ट्र माझा।
वेरूळ–अजिंठा लेण्यांची जेथे महती तो महाराष्ट्र माझा। शाहीर जेथे पोवाडे गाती तो महाराष्ट्र माझा।
गानकोकिळा जेथे राहती तो महाराष्ट्र माझा। क्रिकेटच्या देवाची जेथे वसती तो महाराष्ट्र माझा।
तालमीत जेथे चाले कुस्ती तो महाराष्ट्र माझा। फडावर लावण्याची जेथे मस्ती तो महाराष्ट्र माझा।
मराठी आहे जीथे माऊली तो महाराष्ट्र माझा। सहयांद्रीची जेथे पडे सावली तो महाराष्ट्र माझा।
तारेतारकांची जेथे मायानगरी तो महाराष्ट्र माझा। साहित्यात ज्ञानपीठाची भरारी तो महाराष्ट्र माझा।
शिक्षणाची जेथे असे गंगोत्रि तो महाराष्ट्र माझा। उद्योगधंद्यांची जेथे जंत्रि तो महाराष्ट्र माझा।
देशाच्या राजकारणात ज्याने उमटवला ठसा तो महाराष्ट्र माझा। समाजसेवेचा ज्याने घेतलाय वसा तो महाराष्ट्र माझा।
आर्थिक राजधानी देशाची जेथे तो महाराष्ट्र माझा। देशरक्षणा सैनिक जिथे घडती तो महाराष्ट्र माझा।
तो महाराष्ट्र माझा। । ”
धन्यवाद.